Tuesday, February 25, 2014

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी

   स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी यांची आज २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. या निमित्ताने या महात्म्याची किमान आठवण काढून कृतज्ञता पूर्वक श्रद्धांजली वाहण्याचा हा छोटासा प्रयत्न.  खरंतर आयुष्याचा प्रत्येक क्षणन क्षण केवळ आणि केवळ मातृभूमी आणि तद्नुसार त्या अंतर्गत येणाऱ्या देशबांधवांसाठी व्यतीत करणाऱ्या या महापुरुषाचा केवळ स्वातंत्रवीर एवढासा गौरव उणेपणा चा वाटतो.
    परकी इंग्रजी दास्यातून मातृभूमीची सुटका करणे हे मुख्य ध्येय घेऊन प्रेरित झालेल्या सावरकरांचे जेवढे आभार आज देशाने मानले पाहिजे तितकेच आभार या महापुरुषाला घडवणाऱ्या त्यांच्या पुज्य माता पित्यांचे, त्यांच्या संस्कारांचे, वडील बंधू बाबारावांचे आणि  सांसारिक सुखावर तुळशीपत्र ठेवून निष्ठेने पाठीशी सतत उभे राहण्याऱ्या त्या पवित्र पत्नीचे मानायला हवेत.
    एका जन्मात दोन जन्माठेपा असंख्य वेळा छोटे मोठे कारावास तरी मातृभूमी सेवेची संधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन कधीही सोडली नाही. रत्नागिरीस स्थानबद्धतेत असताना असो किंवा कारावासात बारीच्या (Jailer) जुलुमी अत्याचारांखाली असो शक्य तेवढी मातृभूमी सेवा करण्यास हा जीव झटला, झिजला. कधी सामान्य बंदिवान (ज्यात लुटारू, दरवडेखोर खुनी बंदिवान जन्मठेपेवर सावकारांसोबत अंदमानात शिक्षा भोगत होते), इतर राजकीय बंदिवान, अंदमानात शिक्षा भोगून स्वतंत्र झालेले परुंतु तेथेच स्थायिक झालेले इतर बंदी या सर्वांना सद्य राजकीय परिस्थिती, भारतीय इतिहास, पुढील भारतीय आणि जागतिक राजकीय समीकरणे यांद्वारे प्रबोधन केले. बंदिवानांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी इंग्रज सरकारस आवेदने करून तश्या सोयी (उदा वाचावयास पुस्तके, वर्तमानपत्रे, स्वच्छ जागी जेवण्याच्या व शौचाच्या सोयी ई. ) उपलब्ध करून घेतल्या.
    एखाद्या बैलकडून देखील होणार नाही एवढ्या मात्रेचे तेल काढण्यासाठी घाण्यास जुंपले जाता, जीव जाईतो काथ्याकुट करविता होणारा शारीरिक त्रास, त्या उपर बारीचा शिवीगाळ अश्या परिस्थितीत देखील स्वतः संयमाने जागून, सहन करून इतर सह्बंदिवानांचे नैतिक खच्चीकरण होऊ न देता त्यांमध्ये देशभक्ती जगवण्या सारखे महत्कार्य त्यांनी केले, कारण जेणेकरून जेव्हा केव्हा या बंदिवानांची सुटका होईल तेव्हा त्यांच्या कडून होईतो देशसेवा घडावी हा प्रामाणिक हेतू.
  अंदमानात कारावासात असताना सर्व बंदिवानांसाठी असलेल्या नियमांच्या तसेच सोयी सुविधांच्या अपवादाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर बंधु होय. तरी देखील योग्य त्या सोयी मिळविण्यासाठी करावे लागणारे सर्व प्रयत्न, झगडे, प्रसंगी संप देखील यांनी केला आणि कठोरात कठोर शिक्षेचे धनी देखील झाले.
  अंदमान आणि नंतरच्या जीवनात आणखी एक महत्वाचे कार्य सावरकरांनी केले ते म्हणजे आमिषाने, बलाने, रूढी प्रथांमुळे झालेले धर्मापरीवर्तीतांचे शुद्धीकरण. सावरकर निर्धाराने सांगत, हिंदूंच्या होत चाललेल्या धार्मिक परिवर्तनास जेवढे मुस्लिम ख्रिश्चन  जबाबदार आहेत त्याहूनही किंचित जास्त आपण स्वतः जबाबदार आहोत, आपली मानसिकता, व्यर्थ आणि खुळचट समजुती कारणीभूत आहेत. जर सावरकरांनी हे शुद्धीकरण वेळीच योजिले नसते तर कदाचित आज अंदमानचे विचित्र चित्र आपली पिढी पाहत असली असती.
   एवढ्या कठोर नैर्बंधिक हाल अपेष्टात, कष्टात राहत असून देखील त्यांनी साहित्य आणि त्या आधारे देशसेवा केली.  त्या आत्म्यास सहस्त्र अभिवादन ज्यांनी अशा कठोरात कठोर शारीरिक हालांमध्ये स्वतःचे मानसिक संतुलन तिळभर ढळू न देत दीड हजारांवर काव्य रचना केल्या आणि आश्चर्य वाटेल हे सर्व अश्या परीस्थितीत जेव्हा कारावासात कागदाचा एक चीठूर जवळ बाळगणे म्हणजे दहा दहा दिवस खडी बेडी ची शिक्षा असे, पेन्सिल चे नावच नको, सर्व कविता मुखोद्गत, आज मनन सुरु केले कि दुसरा दिवस उजाडावा तरी काव्य न संपायचे.
   ऐन तारुण्यात विलायतेस  बॅंरिस्टरी शिकण्यास या विनायकास परदेशी स्थायिक होऊन किंवा इंग्रजी गुलाम भारतात एषोरामाची जिंदगी काही अवघड नव्हती तरी देखील मातृभूमी भक्तीच्या बीजास संस्कारांचे जे पोषक वातावरण मिळाले त्यातून हि प्रखर देशभक्ती निपजली आणि त्यायोगेच हि महान प्रभृती आज आपल्या सर्वांच्या मनात चिरंजीव आहे. त्या आत्म्यास कोटी कोटी प्रणाम.