Thursday, June 11, 2015

मधुकोष रक्तदान शिबीर - ७ जून २०१५

मधुकोष रक्तदान शिबीर


"देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ||"


     लीयुगामध्ये दानाचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे, आणि हिंदू धर्मामध्ये दानशूर व्यक्तींचा उल्लेख करणे झाले तर जन्म अपुरा पडावा. अशी दानाची थोर परंपरा घेऊनच जन्माला आलेल्या आपल्या समस्त भारतीयांना या परंपरेचा अभिमानच वाटावा.

     समर्थ रामदास म्हणतात, व्यवहाराचा हेतू ठेवून केले तर ते दान कसे? परोपकार बुद्धीने जेथे स्वार्थाचा लवलेशही नाही आणि व्यवहाराचा मागमूसही नाही तेच खरे दान. स्वतःचे पोट भरल्यावर समोरच्याला अन्न देणारे अनेक आहेत पण ताटातले काढून देणारे विरळाच. स्वतःजवळ आहे म्हणून दिले, कारण माझ्याकडे जास्तीचेच होते, वायाच जाणार होते, याला दान म्हणायचे का? समोरच्याला माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे, म्हणून प्रसंगी पदरमोड करावी लागली तरी बेहत्तर अश्या विचाराने दान करणाऱ्या व्यक्ती ह्या आजच्या समाजामध्ये श्रेष्ट होत.
दानाच्या अश्या थोर परंपरेचा वारसा चालवत यंदाच्या वर्षी "सिंहगड रस्ता येथील मधुकोष" मधील नागरिकांनी रक्तदान शिबीर आयोजित करून खारीचा वाटा उचलला. पहिल्या वहिल्या प्रयत्नाला मधुकोषवासियांनी अक्षरशः भरगोस प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.

     दिनांक ७ जून रविवार रोजी सकाळी ९:३० पासूनच रक्तदात्यांची रीघ लागली होती. सोसायटी मधील जेष्ठ नागरिक आणि सर्वांचे आवडत्या गोखले आजी तसेच डॉ. डोंगरे आजोबा यांच्या हस्ते शिबिराचे ठीक १०:०० वाजता दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजनाने उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला सोसायटी तर्फ्रे कार्यक्रमाच्या नियोजनात सकाळपासूनच हिरीरीने भाग घेत श्रीयुत दीपक जोशी यांनी देखील भरत माता प्रतिमेला पुष्प अर्पण करून स्वतः पहिले रक्तदात्याच्या रांगेत उभे राहिले. जनकल्याण रक्तपेढी तर्फे डॉ. काळे यांनी देखील प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन केले.

     या शिबिराचे महत्व म्हणजे रक्तदान करणाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रिया देखील उत्साहात सहभागी होत होत्या, अनेक जोडपी सहपरिवार रक्तदानाला हजर होते. साधारण सकाळी १०:०० वाजेपासून ते दुपारी १:०० वाजेपर्यंत रक्तदाते येत होते. एकूण ६० संख्या शिबिरामध्ये सहभागी झाली. त्यामध्ये साधारण १५ जणांना काही कारणांमुळे रक्तदान करता आले नाही परंतु त्यांना जनकल्याणच्या डॉक्टरांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन दिले , जसे Hemoglobin कमी असणे, वजन कमी असणे या बाबत माहिती देण्यात आली, जेणेकरून भविष्यात आपल्याला आरोग्य उत्तम राखता येईल, Anemia सारखे आजार होणार नाहीत आणि अश्या उपक्रमामध्ये सहभागीही होता येईल.

     जनकल्याण रक्तपेढी तर्फे प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, तसेच "स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पुस्तक" भेट देण्यात आले, मधुकोष तर्फे देखील प्रत्येक रक्तदात्यास "परिवार प्रबोधन" हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता जनकल्याणचे डॉ. काळे आणि श्री. दौलतराव यांच्या हस्ते सोसायटीचे पदाधिकारी (श्री दिपक जोशी, श्री झीरंगे, श्री पटवर्धन, श्री दिवेकर, श्री बगडिया) यांना प्रशस्तिपत्र आणि भारतमाता प्रतिमा भेट देऊन करण्यात आली.
सर्व हितचिंतकांचे आभार तसेच सोसायटी मध्ये अश्या प्रकारच्या सामाजीक जाणिवेचे दर्शन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन होईल असा विचार करणाऱ्या सर्वांचे आभार. धन्यवाद.

(खाली काही छायाचित्रे देत आहे, तरी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात)